शोधाशोध

Tuesday, January 26, 2010

ब्लॉगबद्दल थोडंसं : My intention to write this MARATHI Blog


नमस्कार मंडळी... राम राम !

सर्वप्रथम आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
बर्‍याच दिवसांपासून मराठीत ब्लॉग लिहिण्याची ईच्छा होत होती पण काही केल्या वेळ मिळत नव्हता. शेवटी आज मुहूर्त लागला.

"मराठी आवाज " अशा नावाचा ब्लॉग सुरू करण्यामागे एक विशेष कारण आहे. या ब्लॉगवर मी आजच्या तरूण पिढीसाठीचे सगळे विचार एक वेगळ्या स्वरूपात, वेगळ्या पद्धतीने मांडणार आहे. आजचा महाराष्ट्र, आजचा 'मराठी माणूस' आणि आजचा 'मराठी तरूण' , मराठी भाषेवरून महाराष्ट्रात सुरू असलेलं रणकंदन , मराठी राजकारण, मराठी कला, चित्रपट, नाटक, आणि सर्वांत मुख्य (माझ्या दृष्टिने) - मराठी उद्योग जगत.

मला माहितीये , हे सगळॅ चावून चोथा झालेले विषय आहेत, आणि लोक आता या विषयांवरच्या चर्चेला कंटाळलेले आहेत. तरीही मी मुद्दाम हेच विषय निवडले आहेत. या सगळ्या बाबत आधी होऊन गेलेली चर्चा मी इथे नाही करणार्......या मागचं सगळ्यांत महत्त्वाचं कारण म्हणजे... मला या विषयावर काही नवीन मुद्दे लोकांसमोर आणायचे आहेत, ज्या बद्दल लोकांना सहसा माहिती नसते, किंवा ती करून दिली जात नाही. तो वेगळा दृष्टीकोन लोकांपुढे मांडण्यासाठी , म्हणून हा ब्लॉग .

त्याचबरोबर आज 'मराठी माणूस' जागतिक पातळीवर कुठे आहे, काय करतोय.
मराठी संस्कृतीची प्रगती कुठवर आहे.
मराठीने काय कमावलंय आणि काय गमावलंय.
कुठे नेमकं काय कमी पडतंय आणि का ?
मराठी बाबतचे वाद काय आहेत .....
आज देशासमोर बाकीचे महत्त्वाचे इतके प्रश्न असताना , आजच्या मराठी तरूणांनी या मराठीच्या वादांना कितपत महत्त्व द्यावं आणि का ? त्या मागची कारणं काय, उपाय योजना काय ?
या सगळ्या बाजूंचा अभ्यासपूर्ण लेखाजोखा मला इथे मांडायचा आहे....

आणि सगळ्यांत महत्त्वाचं कारण ... मला माझ्या स्वतःच्या स्वप्नातील महाराष्ट्राचं दर्शन लोकांपर्यंत पोचण्यासाठी मी हा ब्लॉगचा पर्याय निवडला आहे. त्यासाठी मी माझी नैतिक जबाबदारी सांभाळून हा ब्लॉग लिहिणार आहे. उगाचच उग्र , जहाल आणि तीव्र भावनांना वाट करून देण्यासाठी हा ब्लॉग मी लिहिणार नाही. किंवा कुणा एका व्यक्तीवर-समूहावर-जाती-धर्मावर टीका सुद्धा करणार नाही... त्यामूळे या ब्लॉग वर दिलेल्या पोस्ट्स वर आपापल्या प्रतिक्रिया देताना, वाचकांनी सुद्धा कृपया याची नोंद घ्यावी आणि आपल्या भावनांना आवर घालावा, ही नम्र विनंती.

तर त्यामुळे , आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर ..या रंजक सफरीला सुरूवात करतो..... आपली साथ अपेक्षित आहे..... त्यामुळे या ब्लॉगला रोज अवश्य भेट देत जा , आपण आपले विचार आणि आपली मतं मुक्तपणे मांडावीत, त्यांचा आदर केला जाईल.

तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी देवी तुळजाभवानी , महाराष्ट्राचा व समस्त मराठी मनाचा मानबिंदू - श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज ........... आणि सुखकर्त्या गणेशाला वंदन करून या ब्लॉगची पहिली पोस्ट आपल्या सगळ्यांसाठी प्रदर्शित करतो.......

धन्यवाद !
जय हिंद, जय महाराष्ट्र !

0 comments:

मित्रांना देखील कळवा